बाबासाहेबांची आंतरराष्ट्रीय कीर्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित शोषित, पिडीत समाजाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा विविध देशातील शोषित पिडीत जनतेच्या उत्थानाच्या दृष्टीने जगाला प्रेरक ठरला आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे देशाला आणि जगाला सर्वांगीण विकासाच्या मार्गाला घेऊन जाणारे आहेत याची जाणीव जगातील अनेक अभ्यासकांना होऊ लागली आहे. यासंबंधीचे एक अत्यंत महत्वाचे हंगेरियन लोकांचे उदाहरण आहे.

हंगेरियन लोकांवर प्रचंड प्रभाव

jaibhimश्वेत हंगेरियन डेरडाक टिबोर (Derdak Tibor) हे हंगेरी देशातील एक समाजसुधारक आहेत. टिबोर हे २००४ मध्ये फ्रांसमध्ये गेले होते. फ्रांसची राजधानी असलेल्या पॅरीस शहरातील एका बुक स्टॉलवर फ्रेंच लेखक ख्रिस्तोफ जेफरलोट (Christophe Jaffrelot) यांनी लिहिलेले एक पुस्तक टिबोरने बघितले. ते त्यांनी विकत घेतले. ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांनी आपला मित्र आणि जिप्सी नेता जानोस ऑरसोस (Janos Orsos) यांनी या पुस्तकाबद्दल सांगितले. जानोस देखील खूप प्रभावित झाले. फ्रेंच भाषेतील ज्या पुस्तकाचा टिबोर आणि जानोस यांच्यावर प्रभाव पडला ते पुस्तक म्हणजे “डॉ. आंबेडकर अँड अनटचेबिलीटी” (Dr. Ambedkar and Untouchability) हे होय. या पुस्तकात फ्रेंच लेखक ख्रिस्तोफ जेफरलोट यांनी डॉ. आंबेडकरांचे जीवन , भारतातील शोषित आणि वंचित अशा अशा दलितांसाठी केलेला संघर्ष, त्यांचे तत्त्वज्ञान आणि बुद्ध धम्माचा केलेला स्वीकार या विषयीची विश्लेषणात्मक अशी माहिती दिली आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा टिबोर आणि जानोस यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी डॉ. आंबेडकरांना आपला आदर्श मानला. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनुसार जिप्सी लोकांच्या उद्धाराची चळवळ सुरु केली.

जिप्सी लोकांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे श्वेत हंगेरियन लोकांवर देखील फार मोठा प्रभाव आहे. श्वेत हंगेरियन लोक देखील डॉ. आंबेडकरांना मानतात. बऱ्याच श्वेत लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. जिप्सी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी, म्हणून श्वेत हंगेरियन लोकांनी श्वेत हंगेरियन लोकांनी स्वतः पुढाकार घेतला अये. यांच्या प्रयत्नातूनच “टायगर लिटल स्कूल” २००५ मध्ये स्थापन केले आणि इतर अनेक प्रकल्प राबवले.

जयभीम संघ

जिप्सी लोकांवर डॉ. आंबेडकरांचा आणि बुद्ध धम्माचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे जिप्सी नेता जानोस यांनी जिप्सी लोकांच्या उद्धारासाठी ‘जयभीम नेटवर्क’ किंवा ‘जयभीम संघ’ ची स्थापना केली. ‘जयभीम संघ’ ही एक स्वायत्त संस्था आहे. जिप्सी लोकांनी त्यांच्या लोकांच्या विकासासाठी स्थापन केलेली ही एक संस्था आहे. डॉ. आंबेडकरांच्या, ‘शिका! संघटीत व्हा! आणि संघर्ष करा!’ या संदेशामुळे प्रेरित होऊन जिप्सी लोकांनी डॉ. आंबेडकर हायस्कूल, द लिटल टायगर स्कूल इत्यादी अनेक शाळा सुरु करून लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार सुरु केला. जिप्सी नसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या बॉहन कॅटालीन (Bohn Katalin) यांनी Bhimrao Association आणि सिरोकी लास्ज्लो (Siroki Laszlo) यांनी ‘रॉम सॉम’ (Rom Som) ची स्थापना केली. ही संस्था दक्षिण हंगेरीमध्ये शैक्षणिक कार्य करत आहे.

टिबोर आणि जानोस यांनी २००६ आणि २००७ मध्ये भारताला भेटी दिल्या. या भेटीमध्ये ते नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी अमरावती, पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागांचा दौरा केला. या दौर्यामध्ये त्यांनी बौद्धांनी स्थापन केलेल्या शाळा, कोलेजला भेटी दिल्या. आंबेडकरी चळवळीचा पाया हा बौद्ध धम्मावर आधारलेला आहे हे बघून जानोस फार प्रभावित झाले.

“भारतीय बौद्धांची ओळख ही मला महत्वाची वाटते. म्हणून माझ्या स्वतंत्र धार्मिक संघटनेने ‘जयभीम’ हे नाव धारण केले. हे नाव असा संदेश देते की, आम्ही भारतीय आहोत.” असे जानोस यांनी एका मुलाखतीत संगीतले. पुढे ते म्हणतात की, “आमच्या ध्येयाशी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा तंतोतंत मेल बसतो म्हणून आम्ही आमच्या शाळेचे नाव ‘डॉ. आंबेडकर हायस्कूल’ ठेवले.

हंगेरियन सरकारकडून दाखल

हंगेरियन लोकांवर डॉ. आंबेडकरांचा आणि बुद्ध धम्माचा पडत असलेल्या प्रभावाची हंगेरियन सरकारला डॉ. आंबेडकरांच्या विचारातील क्रांतिकारकता आणि त्यांचा हंगेरी लोकांवर पडणारा प्रभाव यांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. हंगेरीतील शिक्षण विभागाने श्रीमती टिमिया बोरोवस्की (Timea Borovszky) यांच्या नेतृत्वाखाली ३ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जून २००८ मध्ये भारतातील दलितांची परिस्थिती आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवविले होते. या शिष्टमंडळात गाबोर सारप्लझ (Gabor Sarlpz) आणि सुरी सिजील्विया (Suri Szilvia) हे होते. त्यांनी त्यावेळी विदर्भाचा देखील दौरा केला. सुरी म्हणतात की, “भारतीय समाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे.”

डॉ. आंबेडकरांच्या विचारानुसार शैक्षणिक आणि मानव अधिकाराबाबातचे कार्य दक्षिण-पूर्व हंगेरी आणि उत्तर-पूर्व हंगेरी येथे जोरात चालू आहे. हंगेरियन लोकांनी Ambedkar.Hu आणि JaiBhim.Hu ही संकेतस्थळ सुरु केली आहेत. अशाप्रकार डॉ. आंबेडकरांच्या संघावर प्रभाव आहे आणि ते रोमा जिप्सीच्या समस्यांबाबत डॉ. आंबेडकरांच्या विचारातून मार्ग शोधत आहेत.

‘आज भारतातील नवीन पिढीला अमेरिकेचे आकर्षण आहे, तर अमेरिकेतली नव्या पिढीला बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांमुळे भारताचे आकर्षण आहे. पुढील काही वर्षात जगातील तरुणांचे आदर्श हे डॉ. आंबेडकर असतील! ही केवळ कल्पना नाही, तर ती वास्तविकता असेल!’

२००८ च्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट! मला भेटायला एक अमेरिकन मुलगी आली होती. तिचं नाव क्लॅरी ड्रोस्ते (Claire Droste). ती अमेरिकेवरून भारतात अभ्यास करायला आली होती. तिचं वय साधारणतः २१-२२ असावं! तिच्याशी चर्चा केल्यानंतर कळले की, ती बी.ए. करीत असून ‘बुद्धिझम अँड आंबेडकर’ हा तिच्या लाघुशोध प्रबंधाचा विषय आहे. मला क्लॅरीचं कौतुक वाटलं! २१-२२ वर्षाची मुलगी भारतात एकटी येऊन सर्वत्र फिरून आपल्या विषयासंबंधी माहिती गोळा करते. “डॉ. आंबेडकरांविषयी तुला माहिती कशी मिळाली आणि तू हाच विषय का निवडला?” असे दोन्ही प्रश्न एकदमच तिला विचारले.

तेव्हा ती म्हणाली, “डॉ. आंबेडकरांविषयी अमेरिकेत सर्वांना माहित आहे. डॉ. आंबेडकरांविषयी अमेरिकेत सर्वांना माहिती आहे. डॉ. आंबेडकरांविषयी ऑक्सफर्ड प्रकाशनाची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अमेरिकेतली नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांचे विशेष आकर्षण वाटते.”

“नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांचे का आकर्षण वाटते?” – माझा प्रश्न.

“का म्हणजे? डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कार्य सर्वच देशातील लोकांसाठी भूषणास्पद आणि आदर्श आहे. ते महान तर आहेतच पण आणखी महत्वाची बाब म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आधुनिक काळात अमेरिकन लोकांना बुद्ध धम्माविषयी विशेष रुची आहे. ते बुद्ध धम्माचा अभ्यास करू लागलेत.”

ब्राझीलची पत्रकार प्रभावित

फ्लोरेन्सिआ कोस्टा (Florencia Costa) ही ब्राझीलची पत्रकार २००७ मध्ये भारतात आली होती. या भेटीवर आधारित आपल्या अनुभवाच्या अनुषंगाने तिने नमूद केले आहे की, “मी भारतात सर्वत्र फिरले. मला वेगळ्या गोष्टीचे अस्तित्व जाणवले. एका माणसाचा निळ्या सुटातील एक लहानसा पुतळा, काळी टाय, जाड भिंगाचा चष्मा आणि पुस्तक पकडलेला त्यांचा दावा हात छातीवर आहे. त्यांना मी सगळीकडे बघितले. मला डॉ. आंबेडकर लोकांमध्ये दिसले.”

निग्रो अमेरिकन लेखिका आणि पत्रकार वॅलेरी मॅसन जॉन (Valerie Mason John) ही मार्च, २००८ मध्ये नागपूरमध्ये एका कार्यक्रमात आली होती. तिची एक मुलाखत ४ मार्च २००८ च्या ‘हितवाद’मध्ये प्रकाशित झाली. या मुलाखतीत ती म्हणते, “डॉ. आंबेडकरांच्या कार्याने प्रेरित झाल्याने मी बुद्ध धाम्माकडे आकर्षित झाले. बुद्ध धम्माचा अभ्यास करताना मी डॉ. आंबेडकरांबद्दल वाचले त्यावरून माझे मत ‘डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील सम्राट अशोक आहेत’ असे झाले.”

डॉ. प्रदीप आगलावे 

(प्रोफेसर, डॉ. आंबेडकर अध्यासन;

प्रमुख, डॉ. आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभाग,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

संपर्क : ९८८१२६२६६०)

 

 

Related posts