मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ चे उद्घाटन

दि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची यशस्वी वाटचाल
विश्वरत्न बाबासाहेबांच्या दिव्य स्वप्नातील दादरला साकारणार १७ मजली अत्याधुनिक भवन
मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २६ जुलै, १९४४ रोजी ‘दि बॉम्बे शेडय़ुल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ आणि आता ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ या नावाने ओळखली जाणारी संस्था स्थापन केली. समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱया आपल्या समाजबांधवांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या गुणात्मक व जीवनाचा स्तर त्यासोबतच वैचारिक दृष्टय़ा व्यापक विचारांची संस्था असावी, यासाठी ही संस्था स्थापनेचा उद्दिष्ट होता. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ चे मार्गदर्शक रत्नाकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आता १७ मजल्याचे बांधण्यात येणार असून या बांधकामाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक सभागृहाची कल्पना १९३८ साली मांडली होती. ही कल्पना ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ च्या माध्यमातून पुढे कार्यरत आहे. मुंबई शहराचे जागतिक स्तरावरील स्थान लक्षात घेऊन ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ ने दादर येथे १७ मजली भव्य दिव्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे भवन साकारणार आहे. या नियोजित भवनामध्ये मानवाधिकार प्रशिक्षण आणि कार्यशाळा केंद्र, कायदा सहाय्य आणि कृती केंद्र, आर्थिक प्रगती आणि दस्तावेजकरण केंद्र, आंबेडकरी अर्थशास्त्राचे अभ्यास व संशोधन केंद्र, सामाजिक शास्त्र विषयक ज्ञानवर्धन, माहिती संकलन व संशोधन केंद्र, महिला उन्नती व सक्षमीकरण केंद्र, गुणवत्ता निर्मिती व वृद्धी मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र, आरोग्य सेवा प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्य दर्शविणारे 3D / 4D युक्त संग्रहालय, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज ग्रंथालय, सामाजिक केंद्र / सांस्कृतिक सभागृह, कला दालन, विपश्यना केंद्र, अतिथीगृह, अल्पोपहार केंद्र, मध्यवर्ती वातानुकूल व्यवस्था, इमारत व्यवस्थापन सुविधा पद्धती (वायफाय, अग्निरोधक यंत्रणा) आणि प्रशिक्षित सुरक्षा व्यवस्था आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेली दादर येथील जागा महापालिकेच्या आराखडय़ात शाळेसाठीचे आरक्षण दर्शविण्यात आले होते. तथापि, ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ ने या बाबींचे गांभीर्य ओळखून अत्यंत उच्च स्तरावून ही जागा संस्थेसाठी पुन्हा बदलून घेतली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ चा आराखडा तयार केला असून यासाठी लागणारे सर्व शासकीय परवानगी प्राप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच भव्य व अतुलनिय असे भवन साकारण्यासाठी ६० कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र शासनाकडून १० कोटी रुपये मंजुरी प्राप्त करुन घेण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भवन साकारण्यासाठी ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ कटिबद्ध असून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष योगेश वराडे व ट्रस्टी  विजय रणपिसे यांनी संयुक्तपणे केले आहे.
Source – JPN News

Related posts