आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधनावर भर – वाडेकर

पुणे – घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात जास्त सामाजिक प्रबोधनावर भर दिला जाईल, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साऱ्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती साजरी करणे प्रत्येक नागरीकांचे आद्य कर्तव्य आहे. या अनुशंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी सुध्दा विविध उपक्रमाचे आयोजन करुन जयंती महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, यामध्ये डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रमांचा समावेश असणार आहे. सांस्कृतिक महोत्सव व व्याख्यानमाला उपक्रमाचे उद्‌घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमालेत महात्मा फुले व डॉ. आंबेडकर आणि स्त्रियांचे प्रश्‍न, तसेच भटके आदिवासी समाज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या इतिहासाचा घात कोणी केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मनिरपेक्षता या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या 125 जोडप्यांचा सत्कार केला जाणार आहे.

Source – Dainik Prabhat

Related posts