भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती सोहळ्यास दिमाखदार प्रारंभ

नवी मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे सम्राट होते त्यामुळे त्यांचा जयंती उत्सव हा ज्ञानाचा उत्सव असल्याचे सांगत माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला चार दिवसीय १२५ वा जयंती सोहळा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाहिलेली आदरांजली असल्याचे मत व्यक्त केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानून बाबासाहेबांनी समतेचे तत्व प्रस्थापित करणारी राज्यघटना देशाला दिली. त्या राज्यघटनेचा सन्मान करीत आपले आचरण असायला हवे, असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनापासून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत ११ ते १४ एप्रिल २०१६ या कालावधीत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये चार दिवस संपन्न होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त करत होते.

याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, कार्यक्रमाच्या निमंत्रक तथा समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती मोनिका पाटील व उपसभापती सुरेखा नरबागे, आरोग्य समितीच्या सभापती पुनम पाटील, विधी समितीच्या सभापती ॲड. भारती पाटील, क्रीडा समितीचे सभापती प्रकाश मोरे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, तसेच नगरसेवक मनिषा भोईर, अशोक गावडे, डॉ. जयाजी नाथ, शशिकांत राऊत, संजू वाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Source – Eenadu India

Related posts