ठाणे महानगरपालिका साजरी करणार १० दिवस डॉ. आंबेडकर जयंती

ठाणे, १२ एप्रिल, (हिं.स.) : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असून हा जयंती उत्सव १४ एप्रिल २०१६ ते २५ एप्रिल २०१६ या कालावधीत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय भाऊराव मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका शाळांमधील मागासवर्गीय समाजातील १०वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १० विद्यार्थ्यांसाठी १० हजार रूपयांच्या शिष्यवृत्तीची योजना सुरु करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती व्यापक प्रमाणात साजरी व्हावी यासाठी यावर्षी शहराच्या विविध ठिकाणी जयंती उत्सव सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवसापासून सुरु होणार आहे. या दिवशी सकाळी १०.०० वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयामध्ये कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समितीचे सभापती संजय वाघुले, सभागृह नेते अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर कोर्ट नाका व स्टेशन रोड येथील डॉ.आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे.

या जयंती उत्सवानिमित्त १४ एप्रिल रोजी भीमनगर, १६ एप्रिल रोजी शास्त्रीनगर नाका, १७ एप्रिल रोजी कोर्ट नाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयापासून ते स्टेशन रोड येथील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळयापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी १८ एप्रिल रोजी रामनगर, १९ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर रोड, २० एप्रिल रोजी खारटन रोड, २१ एप्रिल रोजी आनंदनगर, २२ एप्रिल रोजी अंबिकानगर क्र.२, २३ एप्रिल रोजी आतकोनेश्वरनगर, २३ एप्रिल रोजी परेरानगर, २४ एप्रिल रोजी साठेनगर/इंदिरानगर, २५ एप्रिल रोजी ढोकाळी आणि शंकर मंदिर परिसर, मुंब्रा येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या जयंती उत्सवामध्ये सर्वांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर संजय भाऊराव मोरे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / १२.४.२०१६ / मेघा माने 

Source – Dailyhunt

Related posts