बिकॅाज ही इज अ लास्ट ॲथॅारीटी

इतिहास म्हणजे बदल, या चिंतनशील वाक्यात इतिहासाची समर्पक व्याख्या सांगणारे आणि समाज परिवर्तनाचा नवा उज्वल इतिहास निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा प्रत्येक पैलु हा इतिहासाच्या नव्या अध्यायाची निर्मिती करणारा आहे.

अमेरिकेतील टेनीस व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर भारतातील हिराकुड नदीवर बांधण्यात आलेल्या दामोदर व्हॅली प्रकल्पाची मूहुर्तमेढ डॉ. बाबासाहेबांनी घातलेली असुन या  समितीच्या एका बैठिकीसाठी जेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी गेले होते तेव्हा मुख्य बैठकिच्या आदल्या दिवशी त्या प्रकल्पात काम करणारे अभियंते बाबासाहेबांना  अनौपचारिक सदिच्छा भेट द्यावयास गेले. त्यावेळी बाबासाहेबांनी त्या लोकांशी वार्तालाप करण्यास सुरवात केल्या नंतर अवघ्या तीन चार मिनटांत त्या सगळयांना बाबासाहेबांचा अभियांत्रीकी क्षेत्रातील असलेला प्रंचड आवाका लक्षात आला आणि त्या अभियंत्याचे अतिशय  गंभीर झालेले चेहरे बघुन दहा पंधरा मिनिटांनी बाबासाहेबांनी जेव्हा आपले बोलणे थांबवून त्या लोकांना आता तुम्ही काही बोला, असे सांगितले.

140-babasaheb-ambedkar_big

त्यावेळी तत्परतेने आणि अतिशय विन्रमतापूर्वक त्या सगळ्यांनी, आम्हाला जर तुम्ही आत्ता जे काही बोललात त्यावर काही बोलायचे असेल तर कमीत कमी आठ दिवस तरी तयारी करावी लागेल, असे सांगितले. यावर बाबासाहेबांनी त्यांना सांगितले की, आपली कार्यालयीन खरी   बैठक तर उद्या आहे. आत्ता मी आपल्या सोबत प्राथमिक बोलतो आहे. त्यासाठी तुम्हाला तयारी करण्याची गरज का पडावी, तुम्ही तर उच्चभ्रु म्हणवल्या जाणा-या समाजातुन आलेले आहात ना आणि तुम्ही राष्ट्राचा आधीचं खुप वेळ घेतला आहे, यावर त्या सगळ्यांनी पुन्हा बाबासाहेबांना विनंती केली की, निदान चार दिवसांचा तरीअवधी आम्हाला द्या त्या नंतरच आम्ही आपल्या समोर या विषयाबाबत काही बोलु शकु ,यावर बाबासाहेब म्हणाले की, चार दिवस काय पण चार महिने जरी तुम्ही तयारी केली तरी मी दहा मिनिटांत जे वक्तव्य केले, जे सांगितले आहे, त्यावर तुम्ही काही तर्क करु शकणार नाही, कारण आय एम द लास्ट ॲथॅारिटी इन माय सब्जेक्ट…..

कोणत्याही विषयातील सखोल ज्ञान आणि त्याला चिंतनाची बैठक असल्याने बाबासाहेबांच्या बोलण्याच्यापुढे कधीचं कुणाला बोलता येऊ शकले नाही.

राष्ट्राला कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे, काय इष्ट, योग्य आहे, याचा नेमका आराखडा त्यांच्या कार्यात, विचारात बघायला मिळतो. डॉ. आंबेडकरांचे स्वातंत्र्याविषयीचे चिंतन अधिक सखोल, मूलगामी आणि सर्वसमावेशक होते.

राजकीय स्वातंत्र्याच्या जोडीने येथील अल्पसंख्याकांना सामाजिक,आर्थिक सांस्कृतिक, वैचारीक स्वांतत्र्यही लाभले पाहीज ही त्यांची भूमिका त्यांनी पहिल्या गोलमेज परिषदेत मांडलेली आहे.त्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले होते की, आम्हाला असे सरकार पाहीजे आहे जे देशाचे खरे हित निष्ठापूर्वक साधले आणि न्याय, निकडीचे असे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न कुणाच्याही रागलोभाची पर्वा न करता सोडवील.

बाबासाहेब हे समाजचिंतक असल्यामूळे समाजातील व्यक्तीमनांच्या अनेक गरजांची  त्यांना नेहमीच जाणिव असे. इथला सामान्य माणूस हा अनेक अंधश्रद्धांनी, संकुचित परिघातील अनेक दोषांनी बधिर झालेला आहे, हे त्यांना अवगत होते. म्हणून माणूस विज्ञाननिष्ठ व्हावा,आधुनिक मूल्यांचे त्यास भान यावे,त्याच्या हक्काची अस्मितेची जाणिव त्याला व्हावी. विभूतीपूजेतून, ग्रंथप्रामाण्यातुन त्याने मुक्त व्हावे, तो निर्भय बनावा या व्यापक उद्धिष्टांभोवतीच बाबासाहेबांचे सर्व लढे केंद्रिभूत झालेले आहेत.

माणसाचा सर्वांगिण विकास हे अंतिम ध्येय असलेल्या बाबासाहेबांनी म्हटले की,घटनेने व्यक्तीला संरक्षणाबरोबर असा विश्वास दयायला हवा की त्याला मिळालेले अधिकार कुणीही सक्तीने हिरावून घेऊ शकणार नाही. घटनेचा हा मूलभूत हेतू राबविण्यासाठी त्यांनी ज्या योजना हाती घेतल्या आणि जे कार्यक्रम राबविले ते अतिशय प्रभावी परिवर्तनवादी होते. डॉ. आंबेडकरांना नुसती राजनैतिक स्वतंत्रता नको होती. त्यांना सामाजिक बदलांची ओढ होती.

रक्तपात न घडवता सामाजिक ,आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरुपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त सांसदीय लोकशाहीतच अवगत असल्याने तोच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत ठरतो. या शब्दात त्यांनी या शासनपद्धतीचा गौरव केला. डॉक्टरांच्या मते, लोकशाही केवळ एक घोषणा किंवा शासनप्रकार असून चालत नाही तर तो समाजाने अंगीकारलेल्या जीवनमार्ग असावा लागतो. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना संरक्षण देणे हे राज्यघटनेचे प्रमुख कार्य मानणार्‌या बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास झाला पाहीजे. त्यात स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ असा भेद न मानता प्रगतीच्या सर्व संधी उपलब्ध होणे आवश्यक मानले. प्रत्येकाला समान स्वातंत्र्य असावे, मुक्त व्यक्तिमत्वाच्या नैतिक तत्वाची प्रतिष्ठापना व्हावी. त्यातुन न्याय समाजाची उभारणी व्हावी या अपेक्षा फक्त लोकशाहीतच पूर्ण होऊ शकतात,असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला होता.  सांसदीय लोकशाही व्यवस्था ही सीमीत शासनाचा आदर्श असल्याने त्यांनी सांसदीय लोकशाहीचे समर्थन केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्याप्रेमी विद्वान आणि व्यासंगी पंडित होते. थोर अर्थतज्ञ, समाजचिंतक, पत्रकार, सुधारक या विविध भूमिका लिलया पार पाडणारे भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेबांचा  मानवी जीवनाशी  निगडित अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होता. आपल्या या ज्ञानाचा पूरेपूर उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी त्यांनी केला. कुटुंब, कुटुंबाचा विकास, स्त्रियांचे आरोग्य, देशाची आर्थिक उन्नती, दारिद्रय निवारण, अन्नपुरवठा अशा विविध उपाययोजनां ज्या आपण आता राबवित आहोत त्या बाबासाहेबांनी खुप आधी सांगितल्या आणि व्यापक स्वरुपात त्याची तरतुद करुन ठेवली.

1924  साली बहिष्कृत हितकारणी सभेच्या मार्फत शिक्षण प्रसाराचे कार्य, कामगारांना, मजुरांना न्याय हक्क, सवलती देण्याची धडपड असलेल्या बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करुन सांसदीय राजकारणात प्रवेश मिळवला. 1937 च्या मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत आपल्या पक्षाचे तेरा उमेदवार त्यांनी निवडुन आणुन दिले आणि सांसदिय लोकशाहीत विरोधी पक्ष कसा जागरुक, तत्पर असाव लागतो, याचा आदर्श बाबासाहेबांनी असेंब्लीच्या कारकिर्दित दाखवला.

1942 साली त्यांची व्हॅाईसरायच्या मंत्रिमंडळात मजुर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी खाण कामगार पोर्ट ट्रस्ट, रेल्वे इतर सार्वजनिक प्रकल्पातील कामगार, गिरणी कामगार, स्त्री मजुर यांच्या हिताकडे जातीने लक्ष देऊन न्याय सेवाशर्ती, गृहयोजना व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या. विमानतळ राजरस्त्यांची कामे बांधकाम अग्रक्रमाने करुन घेतली.
राज्यशास्त्र, नीतीशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, धर्म, घटनाशास्त्र, प्रशासन आणि कायदा अर्थशास्त्र या विविध विषयांचा व्यासंग असणारे बाबासाहेब यांनी त्या प्रत्येक विषयातील प्रस्थापित विचारांच्या पूढे जाणारा त्या ज्ञानशाखांमध्ये मूलभूत भर घालणारा नवा आणि दिशादर्शक वेगळा विचार मांडुन  त्या विषयातील तज्ञ व्यक्तीना सुखद आश्चर्यचा धक्का दिलेला होता. आणि त्यांची आपल्या क्षेत्रात ही कुणी असे मूलभूत संशोधन करावे, नवा विचार मांडावा, आपण मांडलेल्या सिद्धांतावर अभ्यासपूर्ण तर्कवाद करावा, अशी अपेक्षा असे. परंतु बाबासाहेबांच्या चिंतनाची उंची आणि व्यासंगातुन आलेली  अभ्यासपूर्ण मांडणी यापूढे कुणाला कधी जाता आले नाही.

एका व्यापक वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेल्या त्यांच्या विचांराना, भविष्यातील समस्यांचा आणि परिस्थितीचा अचुक वेध घेऊन सुचवलेल्या  उपाययोजनां यांना तर्कवितर्क करण्याची गरज कधी पडली नाही, तर सदय परिस्थितीत त्यांनी सांगितलेले सिद्धांत आणि तत्व हे योग्य पद्धतीने आचरणात आणण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्या विचांरांचा आर्दश मानणार-यांवर आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांच्या पूढे जाणारे  आज पर्यंत काही मांडले गेले नाही तशी शक्यताही नाही बिकॅाज ही इज अ लास्ट ॲथॅारीटी……….. त्यांच्या क्षेत्रातील ते अंतिम सत्ता होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या मार्गांने स्व उन्नती आणि राष्ट्राची उभारणी करण्याच्या जाणिवेतून सगळ्यांनी  कृतीशील राहणे म्हणजे त्यांची जयंती ख-या अर्थाने साजरी होणे आहे.

एक व्यक्ती, एक जबाबदार नागरीक म्हणुन सामाजिक न्याय,समतायुक्त सौहार्दपूर्ण वागण्यातुन देशाच्या या बुद्धीवंत सुपुत्राने आखुन दिलेल्या तत्वांना अनुसरुन  प्रत्यक्ष आचरणातुन समस्त भारतवर्ष सर्वाथाने तेजस्वी वाटचाल करेल यात शंका नाही.

श्रीमती सुलोचना रघुनाथराव थोरात,
सचिव, ॥ विजयरंग प्रतिष्ठान ॥
औरंगाबाद.

Related posts