भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीतून साकारणे हिच खरी आदरांजली – जिल्हाधिकारी

mahanews

अलिबाग : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून साकारणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी पनवेल येथे केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समता व सामाजिक न्याय वर्ष 2015-16 साजरे करीत आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, वनसंरक्षक अलिबाग श्रीमती ज्योती बॅनर्जी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पेणच्या प्रांत अधिकारी श्रीमती निधी चौधरी, अतिरीक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, पनवेल प्रांत अधिकारी भारत शितोळे तसेच कार्यशाळेचे वक्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, श्रीमती रजिया पटेल, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी दलित समाज, महिला व कामगार वर्ग यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांची प्रत्येक कृती ही दूरदृष्टीची होती. त्यांचे कार्य व विचार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपापल्या कृतीतून सर्वांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.पांढरपट्टे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व एखाद्या विशेषणाने पूर्णत: साकारणे शक्य नाही, म्हणूनच त्यांना महामानव म्हणून संबोधले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक पैलू आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष करुन त्यांनी आपल्यासाठी जे कार्य केले ते तसेच त्यांचे मौलिक असे विचार सर्वदूर पोहोचवावेत हे या 125 व्या जयंती वर्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कार्यशाळेत ग्रामस्वच्छता या विषयावर भारत पाटील यांनी उद्बोधक असे प्रभावी प्रबोधन केले. साध्या व सोप्या शब्दात त्यांनी अनेक उदाहरणासह ग्रामस्वच्छतेचे महत्त्व समजाऊन सांगितले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री-पुरूष समानताबाबतचे कार्य या विषयावर श्रीमती रजिया पटेल यांनी तर भारतीय संविधान सद्यस्थिती या विषयावर प्रकाश पवार यांनीही आपले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source – MahaNews

Related posts